देवेंद्र फडणवीस हे नटसम्राट आहेत. त्यांना एखादे नाट्य कसे रचायचे हे चांगले ठाऊक आहे. त्यानुसार त्यांनी सभागृहात पेनड्राईव्ह आणि व्हिडीओ क्लिप सादर करीत महाविकास आघाडी सरकारवर कटकारस्थान करण्याचे नाट्य रचले, असे प्रत्युत्तर काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना दिले. विरोधकांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याची सुरुवात ही फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सुरू झाली, असा आरोपही पटोले यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनच्या क्लिप सादर करीत सत्ताधारी विरोधकांना संपविण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला.
त्यानंतर बोलताना पटोले म्हणाले, पोलीस अधिकार्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.