लसीकरणाच्या नावाखाली शुद्ध फसवणूक
देशातील करोनाला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. तसेच हे लसीकरण ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्य परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये याच लसीकरणाच्या नावाखाली एका तरुणासोबत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
उदयपूरमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला लस देण्याचे सांगून त्याची नसबंदी करून घेतल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार पीडित व्यक्तीला समजताच त्याने भूपालपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उपअधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भूपालपुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी भवानी सिंह यांनी सांगितले की, उदयपूरच्या प्रतापनगर भागात असलेल्या गुरुद्वाराजवळ राहणारा कैलाशपुत्र बाबुलाल गमेती हा २९ डिसेंबरला सकाळी पोलीस स्टेशन हद्दीतील बेकनी पुलियाजवळ मजुरीच्या कामासाठी उभा होता. यादरम्यान सेक्टर पाच मध्ये राहणारा नरेश चव्हाट हा त्याच्याकडे आला. करोनाची लस घेण्यासाठी २००० रुपये मिळतील, असे सांगून नरेशने कैलासला आपल्या जाळ्यात अडकवले.
यानंतर त्याने कैलाशपुत्रला स्कूटीवर बसवून पुला येथील रुग्णालयात नेले आणि तिथे त्याला इंजेक्शन दिले. यामुळे तो बेशुद्ध झाला आणि त्याच्या नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर नरेश कैलासला बहिणीच्या घरी सोडून ११०० रुपये देऊन पळून गेला. ही बाब कैलासला कळताच तो आणि त्याचे कुटुंबीय खूपच अस्वस्थ झाले. त्याचवेळी आरोपींवर कारवाईची मागणी करत त्यांनी भूपालपुरा पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.
पीडित कैलाशच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत तो तिचा एकुलता एक मुलगा असून, विवाहित आहे, पण त्याला मूलबाळ नसल्याचे म्हटले आहे. आता तिला तिच्या नातवाचा चेहरा कसा दिसणार? त्यामुळे तिची काळजी वाढली आहे. पोलिसांनी फसवणूक आणि एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.