उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या अंदाधुंद, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळी राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४६ लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत. त्यासोबतच, अनेकजण बेपत्ता असल्याची देखील माहिती मिळत आहे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी देखील आज पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. “प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ११ जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील जाले आहेत. एकूण मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे”, असं ते म्हणाले. दरम्यान, पाऊस आता कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. गावांना फटका बसला आहे, पूल कोसळले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली