महासभेत भाजपची ‘स्मार्ट’ उपसूचना
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीतील भ्रष्टाचार, रस्ते खोदाईबाबत भाजप नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक महासभेत हल्लाबोल करत असतानाच सत्ताधारी भाजपने बिनबोभाटपणे एक उपसूचना घुसडत कहर केला. रस्ते खोदाई कामाचे नियोजन करण्यासाठी एक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यासाठी ५ वर्षांकरिता ३० कोटीच्या खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीचे काम महापालिका निधीतून करण्यास महासभेने मान्यता दिली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभापार पडली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, शहरातील ५०० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम ७५० किलोमीटर दाखवित झालेला करोडोंचा घोटाळा, तांत्रिक मान्यतेचा अभाव आदींवर महासभेत सहा तास धुम्मस चर्चा झाली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठेही खोदाई केली जाते, नगरसेवकांना खोदाई केलेली माहिती दिली जात नाही. एल अँड टी कंपनीच्या २५० कोटीच्या कामाला तांत्रिक मान्यताच घेतली नाही. स्मार्ट सिटीमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे असे विविध गंभीर आरोप सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी केले. सहा तास चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने निमूटपणे उपसूचना घुसडत ‘स्मार्ट’ कहर केला. सॉफ्टवेअर विकसित करण्याकामी येणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.