थोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत
विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी सकाळी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. येत्या 28 डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. 27 डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चा थोपटे यांच्या नावाची आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे कळते.