भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंकजा दिल्लीत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तत्पूर्वी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या सचिवांच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील सहकार, राजकीय स्थिती तसेच इतर महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले. देशातील महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, यावर तोडगा काढण्याची गरज आहे. गरीब, सामान्य माणसांना चांगले दिवस यायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येयही ते आहे. त्यावर लवकर तोडगा निघेल, असा आपणास विश्वास आहे. राज्यामध्ये सहकार अडचणीत असून, दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसला आहे. इथेनॉलच्या किमतीसंबंधी निर्णय घ्यायला हवा, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे सहकाराच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. मात्र, दिल्लीतच असलेल्या पंकजा मुंडे यांनी, ‘मला त्याबद्दल काहीही कल्पना नाही व अमित शहा यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मी नाही,’ असे स्पष्ट केले. फडणवीस दिल्लीत सहकाराच्याच मुद्यावर अमित शहा यांना भेटणार होते त्याबाबत ‘सॉरी मला काहीही माहिती नाही. मी ‘त्यात’ नाही, पण हरकत नाही कोणी ना कोणी सहकाराच्या मुद्यावर सहकार्य करत असेल तर ते चांगलेच आहे, असे त्रोटकपणे सांगून पंकजा मुंडे यांनी हा विषय संपविला.