हायकोर्टाची पोलीस आयुक्तांना नोटीस,
नागपुरातील गंगा जमुना परिसर हा सार्वजनिक ठिकाण असल्याचं सांगून पोलीसांनी येथील देहव्यापारास बंदी घातली होती. गंगा जमुना परिसर सिल केला होता. या निर्णयाला याचिकाकर्ते मुकेश शाहू यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर गंगा जमुनाचा परिसर सिल का केला? अशी विचारणा न्यायालयानं पोलीस आयुक्तांना केली आहे. पोलीस आयुक्तांसह इतरांनी चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचिकाकर्ते मुकेश शाहू यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 25 ऑगस्ट 2021 रोजी एक अधिसूचना काढली. त्यानुसार, गंगा जमुना वस्तीजवळील काही ठिकाणे सार्वजनिक आहेत, असे म्हटले. त्यात बालाजी मंदिर, चिंतेश्वर मंदिर, बाबा कमलीशाह दर्गा, दुर्गादेवी मंदिर, शारदादेवी मंदिर, राधास्वामी सत्संग, महापालिकेची चिंतेश्वर हिंदी प्राथमिक शाळा, हिंदुस्थान हायस्कूल आदी धार्मिक स्थळांचा समावेश होतो. त्यामुळं गंगा जमुना या ठिकाणांपासून २०० मीटरच्या परिसरात अनैतिक देहव्यापाराला कायद्यानुसार बंदी आहे. या अधिसूचनेनुसार देहव्यापारासाठी या ठिकाणी कोणी प्रवेश केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते.
महिलांचे पुनर्वसन करण्याची मागणी
या अधिसूचनेनुसार, पोलीस प्रशासन देहव्यापार करणाऱ्या महिलांच्या अधिवासात हस्तक्षेप करतात. पोलीस आयुक्तांनी काढलेली ही अधिसूचना मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळं ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, अशी याचिका याचिकाकर्त्याच्या वतीनं करण्यात आली होती. तसेच गंगा जमुनात देहव्यापार करणाऱ्या महिलांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. चंद्रशेखर सहारे व अॅड. प्रीती फडके, शासनातर्फे अॅड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली.
गंगा जमुनाला 300 वर्षांची परंपरा
गंगा जमुना परिसरातील 12 गल्ल्या सिल केल्या गेल्या. कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली गेली. शेकडो पोलीस तैनात केले गेलेत. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीनं पहारा दिला. आजूबाजूच्या लोकांकडून तक्रारी आल्यानं हा परिसर सिल केल्याचं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. गंगा जमुना वस्तीला 300 वर्षांची परंपरा असल्याचा दावा केला जातोय. येथे देहव्यापार करणाऱ्या महिला परराज्यातून येतात. किरायानं खोल्या घेऊन देहव्यापार करतात, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.