देशाचा अर्थसंकल्प सादर करताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लवकरच एलआयसीचा आयपीओ येणार असल्याचे घोषित केले. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली LIC आपला IPO मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.
डिपार्टमेन्ट ऑफ इनवेस्टमेंट अॅन्ड पब्लिक असेट मॅनेजमेन्ट (DIPAM) चे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितलं आहे की, मार्चच्या सुरुवातीला एलआयसीचा आयपीओ बाजारात येण्याची आशा आहे.
एलआयसीचा हा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. भारत सरकार या आयपीओच्या माध्यमातून जवळपास एक लाख कोटी रुपयांचे शेअर्स बाजारात आणणार आहे. या आधी पेटीएमने 18,300 कोटी रुपयाचा आयपीओ बाजारात आणला होता. त्या तुलनेत एलआयसीचा आयपीओ हा पाचपट मोठा असणार आहे.
केंद्र सरकार आपला राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी हा आयपीओ बाजारात आणणार आहे. गेल्या अर्थसंकल्पावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभारणार असल्याचं लक्ष्य आहे असं सांगितलं होतं. एलआयसीचा आयपीओ त्याचाच एक भाग आहे.
केंद्र सरकारने एलआयसीच्या लिस्टिंगसाठी एलआयसी कायद्यात याआधीच सुधारणा केली आहे. नवीन तरतुदींनुसार, लिस्टिंगनंतर पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारची LIC मध्ये किमान 75 टक्के भागिदारी ठेवणार. परंतु त्यानंतर ही मर्यादा 51 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे.