राष्ट्रवादीचा काँग्रेसला अजून एक धक्का
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे. बीडच्या आंबेजोगाई नगरपालिकेनंतर आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकाही राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली आहे. सोनपेठच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांच्यासह ११ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
सोनपेठ नगरपालिकेत नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याता आलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मध्यस्थी केली नव्हती. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यातूनच त्यांनी २२ वर्षांपासून एकहाती सत्ता ठेवलेल्या काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
“सोनपेठ नगरपालिकेचे आम्ही सर्व सदस्य, गटनेते इथे आलो आहोत. २२ वर्षांपासून आम्ही काँग्रेसची सत्ता एकहाती ठेवली होती. पण आता जिल्ह्यातील नेतृत्वावावर विश्वास ठेवून आम्ही सर्व ११ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहोत”.
“२२ वर्ष एकहाती सत्ता टिकवून ठेवली आणि नगराध्यक्ष अपात्र होत असताना तिथे कोणी येत नसेल तर त्यामुळे निर्माण झालेली खंत यामुळे सर्वांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम हेदेखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.