नागपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने माहिती दिली आहे.
निवडणुकी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल बरखास्त करण्यात आले आहे. पक्षाच्या या पदांवर लवकरात लवकर नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या सेल बरखास्त करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सेलच्या प्रमुखांना पाठविण्यात आले आहे.
भाजप-समर्थित बंडखोरीचा धक्का मिळाल्यानंतर सेना आणि राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती असताना, अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे सरकार पडण्यामागे स्वतःचे स्पष्टीकरण देऊ केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सेनेतील फुटीसाठी जबाबदार धरले कारण संजय राऊत यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याचा आग्रह धरला होता. “शरद पवार नसून संजय राऊत यांनी शिवसेना फोडली. संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असं आठवले म्हणाले.