मुंबई उच्च न्यायालयाने एसटी विलिनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असून आता उद्या म्हणजे २२ डिसेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज माध्यमांना न्यायालयातील घडामोडींबाबतची माहिती दिली.
वकील सदावर्ते म्हणाले की, आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सांगितले की, वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखे परिवनहनमंत्री हे बोलतात. आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी नैराश्यात आहेत, ते काम करू शकत नाहीत. तसेच, आज सरकारचा आमचा आणि ज्या संघटना होत्या त्यांचा युक्तीवाद झाला. आम्ही न्यायालायासमोर आज ४८ हजार कष्टकऱ्यांचे लिखित प्रतिज्ञापत्र करून ते सादर केले. सर्व बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावर सुनावणी होणार असल्याची माहिती देखील सदावर्ते यांनी दिली.
याचबरोबर, जाणूनबुजून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे. बडतर्फ, सेवासमाप्ती, निलंबन केले जात असल्याचा आरोपही यावेळी सदावर्ते यांनी केला. तसेच, आम्ही आमचा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.