क्लिन चीट देण्याचा प्रश्नच येत नाही
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारच्या समितीने क्लीन चिट दिल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेला क्लिनचीट देण्यात आलेली नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चीट दिल्याच्या वृत्तावर राज्य सरकारने म्हटलं, 27 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रस्तूत करण्यात आली आहे. परंतु, CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे आणि ही आकडेवारी योजनेची अंमलबजावणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे.
जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे 71% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने चौकशीचे आदेश आधीच दिलेले आहेत. याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे क्लिन चीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही राज्य सरकारने नमूद केलं आहे.
