कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरले आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1270 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 450 रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही चिंतेचीच बाब मानली जाते आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटने महाराष्ट्राची झोप उडवली आहे. महाराष्ट्रासह देशभरात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत आहेत. मात्र सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत ते महाराष्ट्रात.
महाराष्ट्रात कोरोनाच्या 450 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 125 जणांना त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियाहून परतलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा 28 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड, पुणे येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाला 13 वर्षांपासून मधुमेहाचा देखील त्रास होता. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या मृत्यूचे कारण नॉन-कोविड असल्याचे नोंदवले गेले होते. मात्र, NIV अहवालात ही व्यक्ती Omicron संक्रमित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता Omicron व्हेरिएंटने देखील धास्ती वाढवली आहे.
जगात आतापर्यंत 59 ओमिक्रॉन रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा जगातील 121 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत जगभरात ओमिक्रॉनचे 3 लाख 30 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. याशिवाय जगात आतापर्यंत एकूण 59 ओमिक्रॉन संसर्गग्रस्तांनी आपला जीव गमावला आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण हा प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ज्यानंतर जगभरात त्याचा फैलाव झाल्याचं आता दिसून येत आहे.
दिल्लीमध्ये कोरोना ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 350 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 57 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुजरातमध्ये 97 रूग्ण आढळले आहेत त्यापैकी 42 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये 69 रूग्ण आढळले आहेत त्यापैकी 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.