खा. संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उजाळा दिला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येते हे वाजपेयींनी शिकवले’, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. संजय राऊत शनिवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने त्यांनी नेहमी काम केले. त्यामुळे जनता वाजपेयी यांच्याकडे एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहत असते. ‘सबका साथ सबका विकास’ हे फक्त त्यांनाच शोभतं, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.