देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी महागाईचा भडका कायम आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढू लागला आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुड न्यूज दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे ती खरेदी करणे नागरिकांना परवडत नाही. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत पेट्रोल वाहनांच्या किमतीपर्यंत घट होईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ ५ टक्के जीएसटी लावला जात आहे. लिथियम आयन बॅटरींची किंमतही आता कमी होऊ लागली आहे. सर्व पेट्रोल पंपांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसावावीत यासाठी सरकारने आधीच धोरणही आखले आहे. पुढील दोन वर्षांत देशात चार्जिंग पॉईंट मोठ्या प्रमाणात वाढतील.
इलेक्ट्रिक वाहनांना देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी कोणत्याही कृत्रिम प्रोत्साहनाची गरज नाही. पेट्रोलवरील वाहन चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटर 10 रुपये खर्च होतो तर डिझेलसाठी प्रतिकिलोमीटर ७ रुपये खर्च होतो. इलेक्ट्रिक वाहनांबात हा खर्च केवळ 1 रुपया प्रतिकिलोमीटर आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले.